कोपरगाव तालुक्यातील चार मंडलात दुष्काळ जाहीर होण्यासाठी आशुतोष काळेंची औरंगाबाद खंडपीठात याचिका

महाराष्ट्र शासनाने दुष्काळी व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेवून २३ ऑक्टोंबर २०१८ रोजी राज्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर केली. त्यानंतर शासन निर्णय क्रमांक एससीवाय -२०१८/प्र.क्र.८९/म-७ दिनांक ३१ ऑक्टोंबर २०१८ अन्वये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत,नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, संगमनेर, शेवगाव व श्रीगोंदा या तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या शेजारील राहाता, संगमनेर तालुक्याचा समावेश असतांना कोपरगाव तालुक्याला मात्र वगळण्यात आले होते. कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असतांना देखील शासनाने कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी शासनाच्या प्रतिनिधींनी वास्तव परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवून कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील फक्त दहेगाव मंडलातील गावांना शासनाकडून दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. तसेच तालुक्याच्या जिरायती भागातील शेतक-यांनी रास्ता रोको, आमरण उपोषण असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे त्या भागातील ११ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला.परंतु कोपरगाव तालुक्यातील सर्वच भागात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही शासनाकडून दुष्काळ जाहीर होत नाही त्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील केशव काकासाहेब जावळे, देवराम तुकाराम गावंड, सुनील वसंतराव गंगूले आदी शेतक-यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तहसिलदार कोपरगाव यांचे आदेशावरून कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसुली मंडलातील प्रारूप पैसेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्व ७९ गावांची पैसेवारी गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे ५० पैशाच्या आत आहे. हि प्रारूप पैसेवारी अंतिम होऊन दुष्काळ घोषित होण्यासाठी बराचसा अवधी जाणार आहे. दुष्काळाची गंभीर परिस्थिती असतांना देखील दुष्काळी सवलतीपासून तालुक्यातील चारही मंडल वंचित राहणार आहे. त्यासाठी कोपरगाव तालुक्यात प्रसिद्ध केलेली प्रारूप पैसेवारी लवकरात लवकर अंतिम करून वास्तव परिस्थितीचा विचार करून दुष्काळापासून वंचित राहिलेल्या चारही महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी निवेदन दिले आमरण उपोषण केले तरीही शासन कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्यामुळे न्यायालयात जावे लागले असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram