कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल – शिवचरित्रकार श्रीमंत कोकाटे

गावागावात व प्रत्येक खेड्यात शाळा येवून शेतक-यांच्या व कष्टक-यांच्या मुलांना शिक्षण मिळाले ते फक्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांमुळे. कर्मवीर भाऊराव पाटलांनंतर रयत शिक्षण संस्थेचा व्याप व विस्तार माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी मोठ्या ताकदीने उभा करून कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला. त्यांनी सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेले कार्य अजोड असून शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल असल्याचे गौरवदगार प्रसिद्ध इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते व शिवचरित्रकार श्रीमंत शिवाजीराव कोकाटे यांनी काढले. कोपरगाव तालुक्यातील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामांदीर व कनिष्ट महाविद्यालय तसेच श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय सुरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावरील रयत संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३१ वा जयंती सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य युवा नेते आशुतोष काळे होते. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येक घटना विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहून त्या घटनेतील विज्ञानाचा शोध घ्यावा व विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालावी. प्रत्येकाने निर्व्यसनी राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवावा.जगाच्या स्पर्धेत गुणांना किंमत नाही. नापास झाल्यामुळे व कमी गुण मिळाल्यामुळे कधीही निराश होऊ नका .जगाचा इतिहास हा कमी गुण व नापास झालेल्या व्यक्तींनी घडविला आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषाही आत्मसात करा असा मौलिक सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय भाषणात बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य हिमालयापेक्षाही मोठे आहे. कर्मवीरांच्या आदर्श विचारांची शिदोरी सोबत घेवून स्व. शंकररावजी काळे साहेबांनी कर्मवीर आण्णांनी सोपविलेली रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आपल्या जीवनातील ६० वर्ष रयत शिक्षण संस्थेसाठी खर्च करतांना शिक्षणाचे बाजारीकरण होऊ दिले नाही. काळे साहेबांनी खेड्यापाड्यात रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणले. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबातील मुलानाही शिक्षण मिळू शकले त्यामुळे समाजातील कुटुंबाची प्रगती होऊ शकली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत केलेल्या भरीव कामगिरीमुळे ज्या ज्या वेळी रयत शिक्षण संस्थेबाबत बोलले जाते त्या त्या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर स्व. शंकररावजी काळे साहेबांचे नाव आदराने घेतले जात असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले. या १३१ वा जयंती सोहळयाच्या कार्यक्रमासाठी कचरू कोळपे, शिवाजीराव वाबळे, संभाजीराव काळे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच सुनील कोळपे,पोलीस पाटील संजय वाबळे, बाळासाहेब ढोमसे, वसंत कोळपे, जनार्दन कोळपे, राहुल जगधने, माजी प्राचार्य मते एन. ए., आदी मान्यवरांसह विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्राचार्य सुखदेव काळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांनी केला तर आभार प्राचार्या काकडे सी.ए.यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी जुधारे व संजय रणशिंग यांनी केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram