शेतक-यांनी वीज बिल भरूनही वीज रोहित्र बंद का ? - आशुतोष काळे

शेतक-यांकडे कृषी पंपाच्या थकीत विजबिल बाकी असल्यामुळे शेतक-यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन असलेले रोहित्रे बंद करण्यात आली होती. शेतक-यांनी उधार उसनवार करून कृषी पंपाची वीज बिले भरूनही कोळपेवाडी, धारणगाव, ब्राम्हणगाव, सुरेगाव, करंजी, कुंभारी, वडगाव, माहेगाव देशमुख (दोन रोहित्र), तळेगावमळे, वेळापूर, मळेगाव थडी, गोधेगाव, पढेगाव (दोन रोहित्र), हिंगणी, खोपडी, आपेगाव, शहाजापूर, लौकी आदी गावातील वीज रोहित्र आजही बंद आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून शेतक-यांनी वीज बिल भरूनही वीज रोहित्र बंद का ? असा सवाल महावितरणला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केला आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून दुष्काळाची झळा सोसणा-या शेतक-यांवर चालू वर्षीच्या पावसाळ्यात वरुणराजाने कृपा दृष्टी केल्यामुळे सर्व धरणे व शेतक-यांच्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. परंतु विहीर तुडुंब भरूनही शेतक-यांना आपल्या पिकांना वीज रोहित्रच बंद असल्यामुळे पाणी देता येत नाही. त्यामुळे दैव देते आणि कर्म नेते अशी शेतक-यांची अवस्था झाली आहे. मागील तीन वर्षापासून दुष्काळ असल्यामुळे शेतकरी कृषी पंपाची वीज बिले भरू शकला नाही. त्यामुळे वीज बिल थकले. यावर्षी चांगला पाऊस झाला. शेतक-यांनी घरात होत नव्हत ते मोडून प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून चालू हंगामात आपल्या शेतात पिकांची पेरणी केली आहे. परंतु शेतक-यांच्या मागे असलेली साडे साती शेतक-यांची पाठ सोडायला तयार नाही. चालू वर्षीच्या हंगामात शेतक-यांच्या पदरात निसर्गाने भरभरून देण्याचे ठरविले असतांना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतक-यांनी महावितरणचे थकीत वीज बिल भरूनही आजही वीज रोहित्र बंद आहे. शेतक-यांना कृषी पंपासाठी महिन्यातून पंधरा दिवस रात्री व पंधरा दिवस दिवसा आठ तासच वीजपुरवठा केला जातो. यामध्ये केला जाणारा वीजपुरवठाही कधी कधी कमी दाबाने केला जातो. त्यामुळे वीज असूनही कृषिपंप चालू करता येत नाही. कधी कधी कामी वीज दाबामुळे वीज मोटारी नादुरुस्त होऊन त्या दुरुस्त करण्याचा भुर्दंड महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांना बसत आहे. परिसरात जंगली जनावरांचा वावर वाढल्यामुळे शेतकरी आपला जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी शेतीला पाणी भरण्यासाठी जात आहे. शेतक-यांची अवस्थां अतिशय वाईट असून महावितरणने शेतक-यांना वेठीस न धरता वीज रोहित्र तातडीने सुरु करावे अशी मागणी युवा नेते आशुतोष काळे यांनी महावितरणकडे केली आहे. शेतक-यांनी वीज बिल भरूनही वीज रोहित्र बंद असल्यामुळे शेतक-यामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत असून जर लवकरात लवकर महावितरणने वीज रोहित्र सुरु केले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरु शकतात. याची स्थानिक प्रशासनाने नोंद घ्यावी असेही आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram